Wednesday, December 10, 2008

शोध धाडसी मराठी लेखिकेचा

पुस्तकांचं कपाट साफ करताना अनेक पुस्तकं बाहेर पडली. त्यातली काही वाचलेली आणि काही न वाचलेली. मग पुन्हा मनात प्लॅन तयार केला की एवढ्या दिवसांत एवढी पुस्तकं वाचायची आणि मगच नवीन पुस्तक घ्यायचं. बघुया १,१११व्यांदा केलेला हा प्लॅन पूर्ण होतो का ते...

या पुस्तकांमध्ये रक्षंदा जलालने संकलित केलेलं Neither Night Nor Day हे पुस्तक सापडलं. पाकिस्तानी लेखिकांनी लिहिलेल्या खूप सुंदर कथा यामध्ये आहेत. त्यात सर्वात मला आवडलेली कथा होती The Tounge निखत हसनची.

या कथेमध्ये एका राज्यातील लोकांची जीभ छाटून टाकण्याची प्रथा आहे. जिभेमुळे (म्हणजे विनाकारण बडबड करून ) कोणे एके काळी म्हणे या राज्यावर संकट आलं. दुष्काळ पसरला, गावंच्या गावं ओस पडू लागली म्हणून मग तिथल्या एका धर्मगुरूने आदेश काढला याला कारणीभूत जीभ आहे आणि तिला छाटून टाका.

तेव्हापासून फक्त राज्याचा राजा सोडला तर सगळ्यांच्या जीभा कापून टाकण्यात येतात आणि त्यानंतर काय आश्चर्य तर राज्याचा कारभार सुरळीत सुरू होतो. राज्याची भरभराट होते कारण लोक एकमेकांशी बोलूच शकत नाहीत आणि फक्त मान मोडून काम करतात. त्यांचा बडबडण्याचा वेळ सत्कारणी लावला जातो.

पण एक दिवस राजाच्या लक्षात येतं की इथल्या एका मुलीला जीभ नसूनही ती खूप बडबड केल्यासारखा आवाज काढते आहे. तिच्या जवळ गेल्यावर लक्षात येतं की तिची जीभ लहानपणीच छाटली असली तरी जिभेचं मूळ मात्र हळूहळू उगवतयं. मग संपूर्ण राज्याची पाहणी केल्यावर त्याच्या हेच दृश्य पाहून तो हादरून जातो.

थोडक्यात सर्वसामान्यांची मुस्कटदाबी सहज होऊ शकत नाही. त्याला वाचा ही फुटतेच.

कसला जबरदस्त अर्थ या कथेत लपला आहे. काल पुस्तक हाती आल्यावर मी कथा दोनदा वाचून काढली आणि वाचता वाचता खूप एजाँयही केली.

असाच आनंद मला इस्मत चुगतईच्या कथाही भरपूर देतात. चुगतई हिची 'लिफाह' कथाही माझी आवडती आहे. ज्याकाळामध्ये लैंगिक विषयावर बोलणं हेच पाप होतं त्या काळामध्ये दोन स्त्रियांमधील लैंगिक संबंधांवर (लेस्बियन रिलेशन) प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच मजेशीर पद्धतीने ती लिहिली आहे की त्यात कुठेही अश्लीलतेचा अंशही नाही. ही कथा मी दोन्ही वेळा इंग्रजीमध्येच वाचली. एकदा मनुश्रीच्या अंकात आणि Lifting The Veil या अनुवादीत संग्रहात. पण मला ही कथा मूळ ऊर्दू किंवा हिंदीतून वाचायची आहे.

स्त्री लेखिकांचा विषयच निघालाय म्हणून आणखी काही उल्लेख करावेसे वाटतात. त्यात तेहनीमा दुर्रानीला मी टाळूच शकत नाही. तिच्या लेखनाच्या शैलीपेक्षा तिने आयुष्यात घेतलेले अनुभव खूपच भारी आहेत. My Feudal Loard आणि Blasphemy ही पुस्तकं अंगावर काटा आणतात. विशेषतः दुसरं पुस्तकं ढोंगी संत-मौलवी परंपरेवर ताशेरे ओढतं.

पाकिस्तानातल्या रूढीवादी समाजावर खूपच बोल्ड लिखाण तहनीमाच्या दोन्ही पुस्तकात वाचायला मिळतं.
आणखीन खूप साऱ्यांबद्दल लिहावंसं वाटतंय पण यादी खूप मोठ्ठी आहे न संपणारी.

मात्र मराठीत अशा कथा मात्र बऱ्याच दिवसांत वाचायला मिळालेल्या नाहीत याची खंत वाटते. कोणी मराठीतल्या अशा धाडसी लेखिका मला सुचवेल का?

No comments: